चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कड़गमचे (डीएमके) अध्यक्ष एम.करुणानिधी यांना शुक्रवारी रात्री प्रकृती बिघडल्याने चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब कमी झाल्याने शुक्रवारी मध्यरात्री 1.30 वाजता त्यांना कावेरी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं.
करुणानिधींची प्रकृती स्थिर : डॉक्टर
डॉक्टरांचं पथक त्यांच्या रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 94 वर्षीय करुणानिधी दीर्घ काळापासून आजारी आहेत. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी चेन्नईतील गोपालापुरममधील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरु होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका : ए.राजा
करुणानिधी यांचे पुत्र एमके अलगिरी, एमके स्टॅलिन आणि मुलगी कनिमोझी रुग्णालयातच आहेत. तर करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आज सकाळी रुग्णालयात हजर होते. करुणानिधी यांची प्रकृती आता स्थिर असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन डीएमकेचे नेते ए.राजा यांनी केलं आहे.
एआयएडीएमकेचे नेते पहिल्यांदाच करुणानिधींच्या निवासस्थानी
तसंच त्याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी मंत्री आणि एआयएडीएमकेच्या वरिष्ठ नेत्यांसह करुणानिधी यांची भेट घेतली. यावेळी ते डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनाही भेटले. एमआयएडीएमकेच्या नेत्यांनी करुणानिधी यांच्या गोपालापुरमधील निवासस्थानी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी
दुसरीकडे करुणानिधी यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने समर्थक रुग्णालयाबाहेर पोहोचले आहेत. करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी समर्थक प्रार्थना करत आहेत. समर्थकांची संख्या पाहता रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांची प्रार्थना
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी पुत्र स्टॅलिन आणि मुलगी कनिमोझी यांच्याकडे करुणानिधींच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच सर्वप्रकारची मदत देण्याचं आश्वासनही दिलं.