नवी दिल्ली : रायपूरचं नामांतर अटल नगर करण्याच्या निर्णयावर बोलताना माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी म्हटले, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी होऊ नये. करुणा शुक्ला यांनी व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले की, चार राज्यांमधील आगामी निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रमन सिंह हे अटलजींच्या नावाचा वापर करत आहेत.


करुणा शुक्ला पुढे म्हणले, “निवडणुकीसाठी अटलजींच्या नावाचा वापर करण्याऐवजी त्यांच्या विचारांच्या मार्गाने चालले असते, तर अधिक बरे झाले असते. गेल्या नऊ वर्षात रमन सिंह यांनी कधीच अटलजींचं नाव घेतलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट रोजी एम्समध्ये अटलजींची स्थिती पाहिल्यानंतरच लाल किल्ल्यावरुन त्यांचं नाव घेतलं. सर्वकाही निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून केले जात आहे. त्यामुळे त्रास होतो.”

करुणा शुक्ला कोण आहेत?

करुणा शुक्ला या अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी आहे. करुणा शुक्ला सध्या काँग्रेसमध्ये आहेत. छत्तीसगढ काँग्रेसच्या त्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत.

याआधी त्या भाजपच्या आमदार आणि खासदारही होत्या. तब्बल 32 वर्षे त्या भाजपमध्ये होत्या. रमन सिंह यांच्यावरील नाराजीमुळेच त्यांनी भाजपला राम राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.