जोधपूर : कायदा गरिबांसाठी एक आणि श्रीमंतांसाठी एक, असा नेहमीच आरोप होतो. काळवीट शिकार प्रकरणात तुरुंगाची हवा खात असलेल्या बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत राजस्थान सरकार असाच संदेश देऊ पाहत आहे. नात्यात नसलेल्यांनाही सलमान खानला तुरुंगात जाऊन भेटण्यासाठी रांग लावली आहे. धक्कादायक म्हणजे तुरुंग प्रशासन त्यांना भेटूही देत आहे. तेही तासन् तास.


20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली.

सलमानला भेटण्यासाठी त्याच्या दोन्ही बहिणी, बॉडीगार्ड शेरा आणि मैत्रीण प्रिती झिंटा थेट तुरुंगात पोहोचले. विशेष म्हणजे, या सगळ्यांना तास-तास सलमानशी बोलण्यासाठी वेळ दिला गेला.

यावेळी इतर कैद्यांचे नातेवाईक मात्र आपापल्या नात्यातील कैद्याला भेटण्यासाठी ताटकळत उभे होते. कुणाचा भाऊ तुरुंगात होता, तर कुणाचा मुलगा, तर कुणाचे आणखी कुणी नात्यातील, मात्र त्यांना भेटण्यासाठी थांबावं लागत होतं. कारण आत सलमान खानला भेटण्यासाठी त्याच्या नात्यातील लोक आले होते. गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना एक न्याय याचं उत्तम उदाहरण जोधपूर सेंट्रल जेलबाहेर दिसले.

विशेष म्हणजे, याच जोधपूर सेंट्रल जेलच्या बाहेर प्रशासनाने एक मोठं फलक लटकवलं आहे, ज्यावर कैद्यांना भेटण्यासाठीच्या नियमांची यादी चिकटवली आहे. सलमान खानसाठी हे नियम का लागू नाही, असा प्रश्न इथल्या इतर कैद्यांचे नातेवाईक विचारत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.

यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.

संबंधित बातम्या :

निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!

...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!

काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड