चेन्नई: तामिळनाडूतील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून केंद्रस्थानी असलेल्या शशिकला परिवाराला मोठा धक्का बसला आहे. शशिकला यांचे पुतणे टी. दिनकरन आणि त्यांच्या परिवाराची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला.
तामिळनाडूचे मंत्री डी. जयकुमार यांनी ही घोषणा केली. याशिवाय, पक्षाचे पुढील ध्येयधोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
'पक्षाचे कार्यकर्ते आणि जनभावना याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे की, पक्षावर कुणा एका कुटुंबाचं नियंत्रण नसेल. त्यामुळेच आम्ही टी दिनाकरन यांच्यासह संपूर्ण शशिकला कुटुंबाला पक्षातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.' अशी माहिती डी. जयकुमार यांनी दिली.
शशिकला यांनी तुरुंगात जाण्याआधी आपला पुतण्या दिनाकरन यांची पक्षाच्या उपमहासचिवपदी नियुक्ती केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि ई पनीरसेल्वम यांच्यातील बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. त्यामुळे आता तमिळनाडूच्या राजकारणात लवकरच वेगळं चित्र दिसू शकतं.