नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आल्याने, सर्वच राजकीय पक्षांतून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या दिग्गजांनी स्वत: ला झोकून दिलं आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. पण आज निवडणूक प्रचार सभेत त्यांनी एक अजब तर्क लढवला आहे.



जौनापुरमधील आपल्या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपा सुप्रीमो मायावती यांना लक्ष करताना, जर रुग्णवाहिकेवरुन समाजवादी हा शब्द हटवला जाऊ शकतो. तर मग 2000 रुपयाच्या नव्या नोटेवर हत्ती आणि कमळ का चालतो?'' असा सवाल उपस्थित केला आहे.

वास्तविक, उत्तर प्रदेश सरकारने समाजवादी पक्षाच्या नावाने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरु केली. पण यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत, रुग्णवाहिकेवरुन समाजवादी हा शब्द हटवण्याचे आदेश दिले होते.

यावरुनच समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारच, जर रुग्णवाहिकेवरुन समाजवादी हा शब्द हटवला जाऊ शकतो, तर 2000 रुपयाच्या नव्या नोटेवर हत्ती आणि कमळ हे दोन चिन्ह कसे चालतात, असा सवाल उपस्थित केला आहे.