मुंबई : मुंबईच्या मालाड, मालवणीचा समावेश असलेल्याय पी उत्तर विभागातून जवळपास 60 ते 70 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची टेस्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह पेशंटला महापालिका प्रशासनाकडून संपर्क केला जातो. मात्र, पी उत्तर विभागातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या अनेकांशी संपर्कच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर या गायब पेशंटना शोधण्यासाठी पोलिसांच्या मदतीनं शोध मोहिम सुरु केली गेली आहे.


मुंबईची पश्चिम उपनगरं आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. विशेषत: मालाड, बोरिवली, कांदिवली, दहिसरमध्ये कोरोनाची रुग्णणंख्या वेगानं वाढत आहे. यासाठी नुकताच मुंबई महापालिका आयुक्तांनी खास पश्चिम उपनगरं आणि उत्तर मुंबईसाठी वेगळा अॅक्शन प्लान तयार करुन मिशन झिरोची घोषणा केली. मात्र, आता याच नव्या हॉटस्पॉटमध्ये हा प्लान राबवण्यापूर्वीच धक्कादायक माहिती समोर येते आहे. मुंबईतल्या मालाड, मालवणीचा समावेश असलेल्याय पी उत्तर विभागातून जवळपास 70 ते 70 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट बेपत्ता असल्याचं समोर येत आहे. या भागाचे आमदार अस्लम शेख यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.


मुंबईच्या एखाद्या वॉर्डमधील 60-70 पेशंट गायब असणं ही आताच्या घडीला सर्वात गंभीर बाब आहे. टेस्ट झाल्यानंतर अनेकांनी चुकीचे फोन नंबर दिलेत. तर अनेक मजूर गावी निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधणं मुश्कील झालंय. म्हणूनच त्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जात आहे.


मात्र, बेपत्ता असलेल्यांच्या यादीमध्ये काही मृतांची नावे आहेत. तर काही कोरोनामुक्त झालेल्यांचीही नावे आहेत. महापालिकेच्या यंत्रणेत समन्वय नसल्यानं हा गोंधळ असल्याचा दावा भाजपचे प्रभाग समिती अध्यक्ष आणि नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे. त्यामुळे या बेपत्तांच्या यादीतही बराचसा घोळ असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


कोरोना पॉझिटिव्ह पेशंट जर बेपत्ता राहत असतील आणि योग्य वेळेत त्यांच्यावर उपचार होत नसतील तर कोरोना संक्ररमणाचा धोका वाढतो, हे वेगळं सांगायला नको. पण, आता अशा बेपत्ता पेशंटवरुनही राजकारण रंगताना दिसत आहे. कोरोनावर मात करायची असेल तर फक्त तोंडानं आम्ही कोरोनाला हरवणार असं म्हणून चालत नाही. त्यासाठी प्रशासकिय यंत्रणांचा समन्वय आणि सोबतच सकारात्मक लोकसहभागही महत्वाचा आहे.