मुंबई : बॉलिवूडचे ही मॅन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात दाखल होते, त्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांच्या निधनाबाबत देओल कुटुंबीयांकडून माध्यमांना अधिकृत माहिती देण्यात आली नाही. पण, अवघ्या अर्ध्या तासांतच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा सनी देओलने त्यांच्या पार्थिवास मुखाग्नी दिला. त्यानंतर, देशभरातून धर्मेंद्र यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेते धर्मेंद्र यांच्या योगदानाचे वर्णन करत आठवणी जागवत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराबाबत माध्यमांना कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र, शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्यावेळी मी उपस्थित राहिलो, आतमध्ये हेमा मालिनी, सनी देओल, बॉबी देओल होते. आज सकाळीच मला माहिती धर्मेंद्र यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे, मोदी सरकारमधला मंत्री म्हणून लगेचच मी येथे आलो, असे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, धर्मेंद्र हे खासदार असताना 2004 ते 2009 च्या दरम्यान अनेकदा संसदेत भेटायचे, आमची चांगली ओळख होती. हेमा मालिनी यांच्यासोबत सुद्धा त्यांची जोडीने अनेकदा भेट झाली. त्यामुळे सिनेसृष्टीतील या अभिनेत्याच्या बाबतीत माझ्या अनेक आठवणी आहेत, असे धर्मेंद्र यांनी म्हटले.
राज ठाकरेंकडून शोक, जागवल्या आठवणी
ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात 'सुपरस्टार' म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं. १९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं.
करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला.
मुख्यमंत्र्यांकडून शोक संदेश
भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वप्नाळू, युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतला प्रवास वैशिष्ट्यपूर्ण राहिला. कृष्ण- धवल काळ ते रंगीत आणि अलिकडच्या तांत्रिकदृष्ट्या आधुनिक प्रवाहात ते कार्यशील राहिले. ते चित्रपट सृष्टीतील बदलाचे, भरभराटीपासून ते आतापर्यंतच्या काळाचे महत्वाचे साक्षीदार राहिले. नायक म्हणून तरूण वयात सालस, स्वप्नाळू नायक ते विविध चित्रपटात वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी अभिनयाने आयकॉनिक ठरवल्या. शोले चित्रपटातील पडद्यावरील वीरू प्रमाणेच ते प्रत्यक्षातही मैत्र जपणारे होते. सहृदय आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारे, अनेकांसाठी आधार, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या क्षेत्रातील ज्येष्ठत्व ते तितक्याच उमद्यापणाने मिरवत असत. मध्यंतरी त्यांनी लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून बिकानेरचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यांनी चित्रपटसृष्टी आणि अभिनय, या क्षेत्रातील प्रयोगशीलता यांनाच अधिक प्राधान्य दिले. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. एकाच वर्षांत ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपट सृष्टीत सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने आपल्या चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे देओल कुटुंबीयांसह, त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखात सहभागी असून त्यांना ईश्वराने आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शोक
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून, अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, धर्मेंद्र यांच्या अभिनयात नैसर्गिकता, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावनिक ताकद होती. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अनुपमा’, ‘सत्यकाम’, ‘दिललगी’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. विशेषतः ‘शोले’मधील त्यांनी साकारलेली ‘वीरू’ची भूमिका रसिकांच्या मनात अजरामर आहे. धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटूंबियांना, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.