धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी आणि धनाच्या पूजेचा उत्साह!
एबीपी माझा वेब टीम | 28 Oct 2016 06:49 PM (IST)
मुंबई: आज धनत्रयोदशीच्या निमित्तानं राज्यभरात धन्वंतरींची आणि धनाची पूजा केली जाते. नाशिकमध्ये देवांचे वैद्य धन्वंतरींची पुजा करण्यात आली. वैद्य विक्रांत जाधव यांच्या आयुर्वेदिक रुग्णालयात धन्वंतरीसोबतच कुबेराची आणि आयुर्वेदिक साहित्यांची पुजा करण्यात आली. धणे, गूळ यासह लाह्या आणि बत्ताशांचा नैवेद्य दाखवण्यात आला. धन गरजेचं असलं तरी खरी संपत्ती आरोग्य हीच आहे. असा संदेश यावेळी देण्यात आला. दुसरीकडे, मुंबईत धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी दिसून आली. सोन्याचे दर कितीही वाढले असले तरी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठत मुंबईकरांनी सोनंखरेदी केली. शहरातल्या अनेक पेढ्यांवर आणि ज्वेलर्सच्या दुकानात सोनंखरेदीचा उत्साह दिसून आला.