Gold Rate Last 5 Dhanteras: आज धनत्रयोदशी (Dhanteras 2023). यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदीची मोठी खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी मौल्यवान धातू खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे भारतातील बहुतांश लोक या दिवशी सोनं खरेदी करतात. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही हा एक उत्तम पर्याय आहे. कारण वर्षानुवर्षे सोन्याच्या दरांत मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी 24 कॅरेट (10 ग्रॅम) सोन्याची किंमत सुमारे 61 हजार रुपये आहे. गेल्या 5 वर्षांत धनत्रयोदशीला सोन्याचा भाव काय होता? हे तुम्हाला माहितीय का? दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे.
2016 ची धनत्रयोदशी
2016 मध्ये धनत्रयोदशी 28 ऑक्टोबर 2016 रोजी साजरी करण्यात आली. या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 29,900 रुपये होती. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे, 2017 मध्ये सोन्याच्या किमतींत थोडीशी घसरण नोंदवली गेली. 2017 ची धनत्रयोदशी 17 ऑक्टोबरला होती. या दिवशी सोन्याचा भाव 29,600 रुपये इतका होता. ही 24 कॅरेट सोन्याची म्हणजेच, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत होती.
2019 मध्ये वाढले दर
यानंतर 2018 मध्ये धनत्रयोदशी 5 नोव्हेंबरला होती. या दिवशी सोन्याचा भाव 32,600 रुपयांच्या वर होता. 2019 मध्ये धनत्रयोदशी 25 ऑक्टोबरला होती. त्या दिवशी सोन्याचा भाव 38,200 रुपयांच्या पुढे गेला होता. अशाप्रकारे 2018 ची तुलना केली, तर अवघ्या एका वर्षात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम सुमारे 6000 रुपयांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या काळात सोन्याला झळाळी
2020 मध्ये, कोरोनाच्या काळात धनत्रयोदशीचा सण 13 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. यंदा सोन्याच्या दरांत मोठी वाढ झाल्यानं सोन्याचा भाव 51,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. मात्र, 2021 सालापर्यंत सोन्याच्या किमतींत नरमाई येऊ लागली. 2021 मध्ये धनत्रयोदशी 2 नोव्हेंबरला होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा भाव सुमारे 47,650 रुपये होता.
2022 मध्ये सोनं 50 हजारांवर
2022 मध्ये धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला होती. गेल्या वर्षी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आसपास सोन्याचा भाव 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या एक वर्षाचा आढावा घेतला तर सोन्याच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर 50 हजार रुपये किमतीचं सोनं अवघ्या एका वर्षात 60 हजार रुपये झालं आहे. तसेच, गेल्या 5 वर्षांत सोन्याचा दर जवळपास दुप्पट झाला आहे. 2018 मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा दर 32 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आता 61 हजार रुपये झाला आहे. म्हणजेच, सोन्यानं गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. असा रिटर्न पाहिल्यानंतरच लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची निवड करतात.