पणजी : गोव्याची राजधानी पणजीमध्ये एमजी रोडवरील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम काल (बुधवार) रात्री जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास लागलेल्या या आगीत एटीएममधील लाखो रुपये जळाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


एमजी रोडवर धनलक्ष्मी बँकेशेजारी याच बँकेचं एटीएम आहे. काल रात्री शार्ट सर्किटमुळे या  एटीएमला आग लागली आणि आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं. यावेळी एटीएमच्यावर  असणारे एसीचे 4 कॉम्प्रेसर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. पण तोवर एटीएम पूर्णपणे जळून खाक झालं होते. पण ही आग जास्त पसरु नये याची काळजी घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी बरेच प्रयत्न केले त्यामुळे मोठी हानी टळली.

या आगीत एटीएममधील नेमके किती रुपये जळून खाक झाले हे अद्याप जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी यात लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तपासानंतरच यासंबंधी नेमकी माहिती समजू शकेल.