नवी दिल्लीः लाच घेतल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या उद्योग मंत्रालयाचे माजी महासंचालक बी. के. बन्सल यांनी आपल्या मुलासह दिल्लीतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. बन्सल यांच्यावर मुंबईतील एका कंपनीकडून 9 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता.

या आरोपातून त्यांना 16 जुलै रोजी अटकही झाली होती. त्यानंतर चारच दिवसात म्हणजे 20 जुलै रोजी बन्सल यांची पत्नी सत्यबाला आणि मुलगी नेहा या दोघींनी राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर काल बन्सल यांची जामिनावर सुटका झाली. पण घरी येताच, त्यांनी आपल्या मुलासह गळफास घेऊन जीवन संपवलं. या चौघांच्याही आतमहत्येचा भ्रष्टाचाराच्या आरोपांशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान पत्नी आणि मुलीच्या दोन स्वतंत्र चिठ्ठ्या मिळाल्या असून, त्यांची सत्यता पडताळली जात आहे. पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे एक अख्खं कुटुंब संपल्यानं राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे.