अमृतसर : गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशातील असंख्य भाविक अमृतसरमध्ये दाखल झाले आहेत. शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरू नानक देव यांचा आज जन्मदिवस आहे. आजचा दिवस शिखधर्मियांसाठी पवित्र मानला जातो. गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त असंख्य शीख बांधव माथा टेकण्यासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात आले आहेत. ईश्वर एक आहे आणि त्याचे वास्तव्य चराचरात असल्याचा संदेश गुरु नानकांनी समाजाला दिला.
गुरू नानक यांचा जन्म 1469 मध्ये पंजाबमध्ये झाला. सध्या हा भाग पाकिस्तानात येतो. संसारात रमलेले गुरू नानक वयाच्या 30 व्या वर्षी अध्यात्म यात्रेला निघाले. देव हा एक असतो आणि त्याच्यासाठी सर्व समान असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि ते शिखांचे पहिले गुरू बनले. कार्तिक पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी शीख भाविक एकत्र येऊन सर्वांसाठी जेवण बनवतात. हजारो भाविक लंगरमध्ये पोटभर जेवतात.
कर्तारपूर मार्ग भारतीयांसाठी खुला -
भारतातील भाविकांना गुरूद्वारा साहिब या पाकिस्तानातील शीखांच्या तीर्थक्षेत्री प्रवेश दिला गेला आहे. त्यामुळं आज अनेक भाविक माथा टेकण्यासाठी पाकिस्तानमध्ये जातील. पाकिस्तानातील दरबार साहिब येथे भारतातील शीख भाविकांना व्हिसा मुक्त प्रवेश दिला जाणार आहे.