नवी दिल्ली : हाॅस्टेल फी मध्ये वाढ, ड्रेस कोड आणि हॉस्टेलच्या नियमांमध्ये बदल केल्याच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त करत मोर्चा काढला आहे. यामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यापीठामध्ये आज पदवीप्रदान सोहळा सुरू आहे. या सोहळ्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोहळ्याला जाऊन उपराष्ट्रपतींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीसांनी शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेतला आहे.


विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ आणि दिल्ली पोलीसांच्या जवानांना तैनात केले आहे. दरम्यान, आक्रमक होत पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. हॉस्टेलमध्ये फी वाढ, ड्रेस कोड, संचारबंदी यासारखे निर्बंध लादण्यात आले आहे.


आंदोलनकर्त्या एका विद्यार्थ्याने सांगितले, आम्ही १५ दिवसांपासून आंदोलन करत आहोत. मात्र कुलगुरु आमच्याशी बोलण्यास तयार नाहीत. जेएनयूमध्ये जवळपास 40 टक्के विद्यार्थी गरीब आहेत. हॉस्टेलची फी 6 ते 7 हजार रुपयांनी वाढवली आहे. विद्यार्थ्यांना ही फी भरणे शक्य नाही. फी मध्ये अचानक होणारी वाढ अन्यायकारक आहे. तर दुसरा विद्यार्थी म्हणाला, जेएनयू हे अनुदानित विद्यापीठ आहे त्यामुळे इथे गरीब विद्यार्थीही शिक्षण घेतात. जर विद्यापीठ होस्टेलची फी वाढली तर गरीब विद्यार्थी इथे कसे शिक्षण घेऊ शकतील?