नवी दिल्ली: उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातून गुजरातकडे परतणाऱ्या सर्व लोकांना कोरोना विषाणूची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, कुंभमेळ्यातून परत आलेल्या भाविकांना थेट त्यांच्या गावात जाऊ दिले जाणार नाही. ते म्हणाले की सर्व लोकांची कोरोना टेस्ट केली जाईल.


मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, "कुंभमेळ्याला गेलेल्या गुजरातमधील सर्व भक्तांना थेट त्यांच्या गावी जाऊ दिले जाणार नाही. सर्व लोकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. ज्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे, त्यांना 14 दिवसांसाठी अलिप्त ठेवले जाईल. हा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे."


देशभरातील कोट्यवधी लोक कुंभमेळ्यात भाग घेत असून तिथं मोठ्या संख्येने साधु-संत जमले आहेत. देशातील वाढत्या कोविड 19 केसेसच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांनी टीका केली आहे. कुंभमेळ्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचीही मोठ्या प्रमाणात नोंद झाली आहे.


विजय रुपाणी म्हणाले, "कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जे लोक कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत, त्यांना थेट गावात प्रवेश दिला जाणार नाही. कुंभमेळ्यातून परत आलेल्या लोकांना अलग करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी स्थानिक खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जामनगर येथे आले होते. गुजरातमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या उपचारासाठी फारच कमी वेळात रुग्णालयांमध्ये 25 हजार ते 30 हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे रुपाणी म्हणाले.