आग्रा (उत्तर प्रदेश) : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी-एसटी) अॅक्टला विरोध करणाऱ्या प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांना अटक करण्यात आली आणि काही वेळाने त्यांची सुटकाही करण्यात आली. देवकीनंदन ठाकूर पत्रकार परिषद घेत असताना, त्याच ठिकाणी मोठ्या संख्येने आग्रा पोलिस आले आणि ठाकूर यांना अटक करण्यात आली होती.
आग्र्यातील खंदौली येथे देवकीनंदन ठाकूर यांची सभा होणार होती. या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
आपली अटक म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया देवकीनंदन ठाकूर यांनी दिली.
देवकीनंदन ठाकूर हे सहा सप्टेंबर रोजी झालेल्या सवर्ण आंदोलनाचे नेते आहेत. त्यांचा एससी/एसटी अॅक्टला तीव्र विरोध होता. त्यांच्या मते या अॅक्टमुळे समाजात दरी वाढत जात आहे.
काही दिवसांपूर्वीच एबीपी न्यूजशी बोलताना देवकीनंदन ठाकूर म्हणाले होते की, “जर सरकार एससी/एसटी अॅक्टसाठी पुढाकार घेत असेल, तर माझं मत मांडून, त्या अॅक्टला विरोध करण्याचा अधिकार मला नाहीय का? आम्हालाही एससी/एसटी अॅक्ट हवाय, मात्र सुप्रीम कोर्टाने जसा सांगितला आहे तसा हवाय.”
“जर कोणत्या कायद्यामुळे समाज विभागला जात असेल, तर सर्व खासदार आणि पक्षांना माझं आवाहन आहे की, यावर विचार करावा. आम्ही सरकारला दोन महिन्यांचा अवधी देत आहोत. त्यानंतर जे होईल, ते सर्वजण पाहतीलच.”, असा इशाराही देवकीनंदन ठाकूर यांनी दिलाय.