नवी दिल्ली : फेसबुकच्या डेटा लीकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपवरही डेटा विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत हा आरोप केला.


राहुल गांधी यांनी फ्रान्समधील एका हॅकरच्या ट्वीटच्या आधारवर बातमी शेअर केली. नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सचा डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा दावा एलियट एल्डरसन या हॅकरने केला.

राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधत ही बातमी शेअर केली आणि डेटा विकला जात असल्याचा आरोप केला. ‘माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही माझ्या अधिकृत अॅपवर लॉग इन करता तेव्हा तुमची सर्व माहिती मी माझ्या अमेरिकन कंपनीतील मित्रांना देतो’, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.


फ्रान्सचा हॅकर एलियट एल्डरसनने ट्विटरवर नमो अॅपमधून डेटा थर्ड पार्टीला विकला जात असल्याचा दावा केला. युझर नमो अॅपवर जेव्हा प्रोफाईल तयार करतात, तेव्हा त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप in.wzrkt.com या थर्ट पार्टीला शेअर केली जाते, असा दावा एलियट एल्डरसनने केला.


कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने फेसबुकच्या माध्यमातून युझर्सची वैयक्तिक माहिती चोरल्याचं समोर आलं होतं. फेसबुकनेही आपली चूक झाली असल्याचं मान्य केलं. त्यामुळे तुमचा-आमचा डेटा सोशल साईट्सवर किती सुरक्षित आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेस 2019 च्या निवडणुकीची तयारी कॅम्ब्रिज अॅनालिटिकासोबत करत असल्याचा आरोप केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधणं सुरु केलं. कायदेमंत्री खोट्या बातम्या पसरवत असल्याचं राहुल गांधी म्हणाले होते.