Telecom Department Order: नवी दिल्ली : देशातील 6 लाख 80 हजार मोबाईल नंबर (Mobail Numbers) आता टेलिकॉम विभाग (Telecom Department) बंद करण्याच्या तयारीत आहे. चुकीच्या कागदपत्रांचा (Wrong Document) वापर करुन हे मोबाईल नंबर्स खरेदी करण्यात आल्याचा संशय टेलिकॉम विभागाला आहे. त्यामुळे टेलिकॉम विभागानं कारवाईचा बडगा उचलला असून येत्या 60 दिवसांच्या आत तब्बल 6 लाखांहून अधिक मोबाईल नंबर टेलिकॉम विभागाकडून बंद केले जाणार आहेत. दरम्यान, कोणत्याही युजरनं जर चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून ही कागदपत्रं मिळविली असतील, तर असे नंबर्स बंद होणं निश्चित असल्याचं टेलिकॉम विभागानं सांगितलं आहे.
देशाच्या दूरसंचार विभागानं टेलीकॉम सर्विस प्रोवायडर्सना सहा लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील 6 लाख 80 हजार मोबाईलची संख्या असून या नंबरला फेक किंवा बनावट डॉक्युमेंटचा आधार घेऊन चालू केल्याचा संशय टेलिकॉम विभागाला आहे. त्यामुळेच टेलिकॉम विभाग ही धडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
बनावट डॉक्युमेंट्सद्वारे नंबर्स घेतल्याचा संशय
दूरसंचार विभागानं आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) द्वारे विश्लेषण केल्यानंतर देशभरातील अंदाजे 6.80 लाख मोबाईल कनेक्शन स्पॅम क्रमांक असल्याचं समोर आलं आहे. जे कनेक्शन्स खोट्या किंवा बनावट कागदपत्रांचा वापर करून मिळवल्या गेल्याचा संशय आहे, असे मोबाईल नंबर्स येत्या 60 दिवसांत बंद करण्याची मोहिम टेलिकॉम विभागानं हाती घेतली आहे.
टेलिकॉम विभागाकडून दोन महिन्यांची मुदत
टेलिकॉम विभागानं टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांच्या आत ओळखलेल्या मोबाईल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. "टेलिकॉम विभागानं अंदाजे 6.80 लाख मोबाईल कनेक्शन्स ओळखले आहेत. ओळखीचा पुरावा आणि पत्ता प्रमाणपत्र यांसारख्या बेकायदेशीर, खोट्या आणि बनावट केवायसी दस्तऐवजांचा वापर करून ही कनेक्शन मिळवल्याचा संशय आहे." असं निवेदनात म्हटलं आहे.
कशी केली जाणार कारवाई?
टेलिकॉम विभागानं टेलिकॉम सर्विस प्रोवायडर्सना संशयित मोबाईल क्रमांकांची यादी दिली असून अशा नंबर्सची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सर्व टेलिकॉम कंपन्यांना 60 दिवसांच्या आत ओळखलेल्या कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणं बंधनकारक आहे.
टेलिकॉम कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या पडताळणीमध्ये जर या कनेक्शन्सबाबत पुन्हा संशय उपस्थित झाला तर असे नंबर्स पुन्हा बंद करण्यात येतील.
या एप्रिलमध्ये टेलिकॉम विभागानं अनेक हजार कनेक्शन बंद केले होते.
टेलिकॉम विभागानं एप्रिलमध्ये पुन्हा पडताळणीसाठी 10,834 संशयास्पद मोबाईल क्रमांक ओळखले होते आणि यापैकी 8272 मोबाईल कनेक्शन पुनर्पडताळणी अयशस्वी झाल्यामुळे बंद करण्यात आले होते. चुकीच्या किंवा बनावट केवायसी दस्तऐवजांचा वापर सूचित करते की, हे मोबाईल कनेक्शन चुकीच्या पद्धतीनं प्राप्त करण्यात आले आहेत.