नवी दिल्ली : नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. नोटाबंदीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे नोटाबंदीच्या निर्णयाने फायदा कसा झाला, ते सांगण्यासाठी सरकारनेही जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे.


विरोधक देशभरात काळा दिवस साजरा करणार आहेत. तर सरकारकडून 8 नोव्हेंबर काळे धन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात येतील.

मोदी सरकारचे मंत्री विविध शहरांमध्ये

मोदी सरकारचे दिग्गज मंत्री नोटाबंदीचा फायदा सांगण्यासाठी विविध शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवाय भाजप सत्तेत आल्यापासून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले, याची माहिती दिली जाणार आहे.

भाजपाध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यासह अनेक मंत्री विविध शहरांमध्ये असतील. पीयुष गोयल अहमदाबादमध्ये, तर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण चेन्नईमध्ये पत्रकार परिषद घेतील.

याचप्रमाणे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी मुंबईत, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर बंगळुरु, स्मृती इराणी लखनौ, मुख्तार अब्बास नक्वी चंदीगड, जयंत सिन्हा कोलकाता, अनंत कुमार हैदराबाद आणि सुरेश प्रभू जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेतील.

दरम्यान नोटाबंदीवरुन विरोधकांच्या टीकेचा सामना करत असेललं मोदी सरकार नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्तांवर टाच आणण्यासाठी सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो.

संबंधित बातम्या :

नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मोदी आणखी एक धक्का देणार?


नोटाबंदीचं एक वर्ष : देश किती कॅशलेस झाला?