नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींना सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीमुळे होणाऱ्या अडचणींविषयी जाणीव आहे, असं स्पष्टीकरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदींशी झालेल्या भेटीनंतर दिलं आहे.


अखिलेश यादव यांनी नोटाबंदीमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर अखिलेश यादव यांची नोटाबंदीबाबतची भूमिका नरमाईची दिसून आली.

अखिलेश यादव आणि मोदींच्या भेटीचं कसलंही पूर्व नियोजन नव्हतं. मात्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांची मोदींसोबत भेट झाली. त्यानंतर मोदींनी त्यांच्याशी चर्चा केली.

अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नागरिकांना होणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच त्यासाठी ठोस पाऊलं उचलण्याची मागणी केली. मोदींना सर्व सामान्य जनतेच्या अडचणींची जाणीव आहे, असं त्यांनी भेटीनंतर सांगितलं.

दरम्यान यापूर्वी अखिलेश यादव यांनी नोटाबंदीवरुन मोदीवर टीका केली होती. जागतिक मंदीच्या काळात काळ्या पैशानेच भारतीय अर्थव्यवस्थेला सावरलं, असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं होतं.