नवी दिल्ली : नोटाबंदीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीचे घाव काळानुसार जास्त वेदनादायक होत आहेत, असं मत मनमोहन सिंह यांनी व्यक्त केले.


मनमोहन सिंह म्हणाले की, "पूर्वतयारी न करता मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसह समाजावर झालेल्या विनाशाचा परिणाम आता सर्वांसमोर आला आहे. नोटाबंदीमुळे समाजातील प्रत्येक घटकातील लोकांवर दुष्परिणाम झाला आहे, मग ते कोणत्याही धर्माचा, वर्गाचा, वयाचा व्यक्ती असेल." नोटाबंदीची शिक्षा अजूनही लोक भोगत असल्याचे वक्तव्य मनमोहन सिंह यांनी केले आहे.

मोदी सरकारने यापुढे आर्थिक विषयासंदर्भात असा कोणताही निर्णय घेऊ नये जेणेकरुन देशाची अर्थव्यवस्था ढासळेल. देशातील मध्यम आणि किरकोळ व्यापारी अजूनही नोटाबंदीची झळ सोसत आहेत, असं म्हणत मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

मोदी सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीनीं देशाला उद्देशून केलेल्या भाषणात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. एकीकडे सत्ताधारी नोटाबंदीचे फायदे सांगत आहेत तर दुसरीकडे विरोधीपक्ष या निर्णयाला अयशस्वी आणि सकंट मानत आहे.