नवी दिल्ली : नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्ला होता असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदी निर्णय घेऊन चलनातून 1 हजार आणि 500 रुपयांच्या बंद केल्या. या निर्णयाला आज तीन वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. तर, सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही नोटबंदीला एक संकट म्हटले आहे. ज्याने आपली अर्थव्यवस्था रसातळाला गेली.

काय म्हणाले राहुल गांधी?
"नोटबंदी या दहशतवादी हल्लाला 3 वर्ष पूर्ण झाली, या हल्ल्याने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला. लाखो लोक बेरोजगार झाले, याला जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा देणे बाकी आहे", असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.


प्रियंका गांधी काय म्हणाल्या?
"नोटबंदीच्या निर्णयाला ३ वर्ष पूर्ण झाली. सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी नोटबंदीवरुन केलेले सर्व दावे आता खोटे ठरले आहेत. नोटबंदी हे एक संटक होते, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था कोलमडली. या तुघलकी निर्णयाची जबाबदारी आता कोण घेणार?", असा प्रश्न करत प्रियंका यांनी सरकारला धारेवर धरले आहे.