सहा डिसेंबरपर्यंत 11.85 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी या संदर्भातले आकडे जाहीर केले. नोटाबंदीनंतर सुमारे 4 लाख कोटीच्या नव्या नोटा आणि 1 हजार 910 कोटीच्या कमी रकमेच्या (शंभर किंवा त्याखालील) नोटा व्यवहारात आणण्यात आल्या.
याशिवाय पुढच्या 3 ते 4 आठवड्यात मोठ्या प्रमाणावर 500 च्या नव्या नोटा व्यवहारात येतील, अशी माहिती अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली. एक हजारच्या नव्या नोटांसंदर्भात आरबीआयनं कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं उर्जित पटेल यांनी स्पष्ट केलं.
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. आरबीआय लवकरच शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. त्याचप्रमाणे वीस, पन्नास आणि शंभरच्या जुन्या नोटाही चलनात राहणार असल्यामुळे नागरिकांनी कसलीही काळजी करण्याची गरज नाही, असं आरबीआयने म्हटलं आहे.