नवी दिल्ली: 'मोदींचा नोटाबंदीचा निर्णय हा ऐतिहासिक नव्हे तर मूर्खपणाचा आहे.' अशा शब्दात राहुल गांधी यांनी नोटबंदीचा निषेध केला. नोटाबंदीला आज एक महिना पूर्ण होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी आज संसद परिसरात येऊन आंदोलन केलं.
सरकारवर घणाघाती टीका करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. 'कोण म्हणतं की, मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानं देशाचं बरंच नुकसान झालं आहे.'
काळ्या फिती बांधून विरोधकांनी आजचा दिवस काळा दिवस म्हणून जाहीर केला. काँग्रेस नेत्यांसोबतच डावे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.
नोटाबंदीचा निर्णय, त्याची अंमलबजावणी यावर मोदींनी सभांमध्ये न बोलता सभागृहात येऊन बोलावं. अशी मागणी यावेळी केली गेली.
दरम्यान, सुट्ट्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक सध्या बेजार झाले आहेत. एटीएममधूनही बहुतांश वेळा दोन हजार रुपयांची नोट येत असल्याने राज्यापासून देशभरात सर्वत्र सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे.