नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल्या शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर सारेच आवाक झाले आहेत. कारण या रुग्णालयात नवजात बाळाला त्याच्या जन्मानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पण अंत्यसंस्कारावेळी ते अर्भक जिवंत असल्याचं समोर आलं. या घटनेनं सारेच आवाक झाले असून, रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात बदरपूरमधील एका महिलनेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण या बाळाची कोणतीच हलचाल होत नसल्याचं पाहून डॉक्टरांनी, त्याला मृत घोषित केलं. आणि बाळाच्या वडिलांना त्याचा मृतदेह एका बॉक्समध्ये पॅक करुन दिला.

यानंतर कुटुंबियांनी त्याच्यावर अंत्यसंस्काराची तयार सुरु केली. पण त्याचवेळी बाळाच्या आत्त्याला त्याची हलचाल जाणवली. यानंतर डॉक्टरांनी पॅक करुन दिलेल्या बाळाला त्या बॉक्समधून बाहेर काढलं, त्यावेळी ते जिवंत असल्याचं दिसून आलं.

कुटुंबियांनी तत्काळ बाळाला आपोलो रुग्णालयात दाखल करुन त्याची तपासणी केली. अन् नंतर पुन्हा सफदरजंग रुग्णालयात ते बाळ दाखल केलं. यानंतर कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत, रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाची तक्रार दाखल केली.

दरम्यान, या प्रकरणी सफदरजंग रुग्णालयाच्या प्रशासनानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. पण दुसरीकडे त्या बाळाला मृत घोषित करण्यापूर्वी एक तास डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचं एका डॉक्टरानं सांगितलं.