नवी दिल्ली : बांधकामापासूनच चर्चेत असलेलं दिल्लीतलं नवीन महाराष्ट्र सदन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आहे. दिल्लीत यावेळच्या मोसमात पडलेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने महाराष्ट्र सदनाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण केलं आहे. कारण छत गळतंय म्हणून महाराष्ट्र सदनाच्या अगदी लॉबीतच वेगवेगळ्या ठिकाणी बादल्या मांडून ठेवल्याचं चित्र दिसलं.


महाराष्ट्र सदनाच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन जून 2013 मध्ये करण्यात आलं होतं. अजून या इमारतीला 10 वर्षेही झाले नाहीत तोवरच असं चित्र दिसू लागलं आहे. महाराष्ट्र सदनात प्रवेश केल्यानंतर लगेच एक प्रशस्त लॉबी आहे. या प्रशस्त लॉबीला स्कायलाईट (काचेचं) छत आहे. या छतातून पावसाचं पाणी गळू लागल्याने पाच ठिकाणी छोट्या छोट्या बादल्या मांडल्याचं चित्र काल (17 ऑगस्ट) पाहायला मिळालं.


महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीने गळती होत असल्याचं सांगितलं. स्कायलाईट छतच्या डागडुजीची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत पाऊस तसा फार पडत नाही, कालचा पाऊस हा या मोसमातला पहिलाच मोठा पाऊस होता आणि त्या एकाच पावसाने या इमारतीच्या कामाचे वाभाडे काढले. त्यात प्रवेशद्वारावरच बादल्या मांडण्याची वेळ आल्याने या दिमाखदार वास्तूच्या शोभेलाही त्यामुळे गालबोट लागलं.


नवीन महाराष्ट्र सदनाच्या या इमारतीवर दीडशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. या कामात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणात छगन भुजबळ यांना तुरुंगातही जावं लागलं होतं. राजकीय दृष्ट्या दिल्लीतलं महाराष्ट्र सदन हे कायमच संवेदनशील राहिलेलं आहे. त्यामुळे आता या कामातल्या त्रुटीकडे प्रशासन तातडीने लक्ष देणार का असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण या सदनावर देखभालीसाठीही महिन्याला होणारा खर्च लाखोंमध्ये आहे. शिवाय दिल्लीतली एक दिमाखदार वास्तू असल्याने अनेक व्हीआयपींची धाव महाराष्ट्र सदनाकडे असते. अनेक बैठकांसाठीही महाराष्ट्र सदनाला प्राधान्य दिलं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही देखभाल तातडीने होणंही गरजेचं आहे.


Maharashtra Sadan Leakage | मोठ्या पावसाने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला गळती