Delhi water crisis : सध्या देशासह राज्यात उष्णतेचा पारा (Heat Wave) चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा (Temperature) पारा हा 45 अंशावर गेलाय. तर देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) परवा 52 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. त्यामुळं या काळात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, दिल्लीत एका बाजुला उष्णतेची लाट आहे तर दुसऱ्या बाजूला जलसंकट आहे. त्यामुळं आता दिल्लीतील पाणीटंचाईचा (Water Crisis) मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. 


दिल्लीची गरज पूर्ण करणे ही सर्वंकष जबाबदारी


दिल्लीत सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. दिल्ली सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी एक महिना अतिरिक्त पाणी द्यावं या मागणीची याचिका दाखल केली आहे. उष्णतेची लाट असतानाच दिल्लीत पाणीटंचाई आहे. दिल्लीची गरज पूर्ण करणे ही सर्वंकष जबाबदारी असल्याचा उल्लेख याचिकेत दिल्ली सरकारकडून करण्यात आला आहे. 


महाराष्ट्रातही पाणीटंचाई 


यावर्षी देशातील बहुतांश ठिकाणी पाणीटंचाई झाली आहे. महाराष्ट्रातही सध्या पाणीटंचाई भासत असल्याचं चित्र दिसत आहे. राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. आजमितीला या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 29.07 टक्क्यांवर होता. लघु प्रकल्पांत 26.11  टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी हा पाणीसाठा 33.55 टक्के इतका होता.  छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात पाण्याची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी आहे, त्यामुळे जनावरांचे मोठे हाल होत आहेत.


वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळं अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय


वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळं अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक पायपीट करताना दिसत आहे. तसेच नागरिकांबरोबर जनावरांच्या पाण्याच्या प्रश्न देखील निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळं लवकरात लवकर पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कालच केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दिलेल्या वेळेच्या आधीच एक दिवस मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात  7 ते 8 जूनला मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.  


महत्वाच्या बातम्या:


राज्याला पाणीटंचाईच्या संकटाने घेरले; मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.98 टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई