School Reopen : शाळांसंदर्भात दिल्ली सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. शाळांसोबत कॉलेज, युनिवर्सिटी आणि कोचिंग क्लासेसदेखील सुरु करण्यात येणार आहे. DDMA नं शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. डीडीएमएनं दिलेल्या माहितीनुसार, 50 टक्के क्षमतेसह शाळा सरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंगसाठी वेगवेगळा फॉर्म्युला असेल. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन शिफ्टमध्ये कमीत कमी एक तासाचा अवधी असणं आवश्यक आहे. तसेच मुलांनी आपला डबा, स्टेशनरी सामान आणि पुस्तकं एकमेकांसोबत शेअर करु नये, असाही सल्ला देण्यात आला आहे. 


शाळा आणि कॉलेज सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना 



  • लंच ब्रेक वर्गात न देता एखाद्या मोकळ्या मैदानात, वेगवेगळ्या वेळी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरुन जास्त गर्दी होणार नाही.

  • बैठक व्यवस्था योग्य अंतरावर असेल, याकडे लक्ष द्यावं. 

  • मुलांना शाळेत येण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घेणं आवश्यक आहे. जर एखाद्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं नसेल तर त्याला तसं करण्यास भाग पाडू नये.

  • कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना येण्याची परवानगी नसेल.

  • शाळा परिसरात एक क्वॉरंटाईन रुम असणं बंधनकारक असेल. गरज भासल्यास एखादा विद्यार्थी किंवा शिक्षकांना तिथे ठेवता येईल. 

  • याची खात्री करावी की, शाळेत जास्त वावर असणाऱ्या जागेची स्वच्छता नियमितपणे करणं गरजेचं असेल. शौचालयात साबण आणि पाण्याची व्यवस्था असवी. त्यासोबतच शाळेच्या आवारात थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर आणि मास्क इत्यादी गोष्टी उपलब्ध करुन द्याव्यात. 

  • एन्ट्री गेटवर थर्मल स्कॅनर अनिर्वाय असेल. मुलांसोबतच शिक्षकांसाठी मास्क अनिर्वाय असेल. 

  • मुख्याध्यापकांनी एसएमसी मेंबर्ससोबत मिटिंग, कोविड प्रोटोकॉल प्लान आणि थर्मल स्कॅनर, साबण आणि सॅनिटायझर इत्यादींची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

  • मुख्याध्यापकांनी शाळेत येणारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असावं याची खात्री करुन घ्यावी. 


24 तासांत जगभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात


भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. काल दिवसभरात जगातील सर्व दैशांपैकी सर्वाधिक कोरोनाबाधित भारतात आढळून आले आहेत. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,909 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच 380 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अशातच गेल्या 24 तासांत 34,763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


वर्ल्डोमीटर वेबसाईटनं दिलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात भारतात सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अमेरकेत 37262, ब्रिटनमध्ये 33196, इराणमध्ये 31516, जपानमध्ये 22748 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रशिया, मेक्सिको, इराण, इंडोनेशियात भारताहून कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 27 लाख 37 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 210 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 19 लाख 23 हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 76 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.