नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर असतानाच राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीच्या जाफराबाद परिसरात काल (24 फेब्रुवारी) भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचं वातावरण आहे. कालच्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर-पूर्व दिल्लीच्या बऱ्याच भागांमध्ये 144 कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
पाच मेट्रो स्टेशन बंद
डीएमआरसीने दिल्लीतील अनेक मेट्रो स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलं आहे. जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकलपुरी, जोहरी एनक्लेव्ह, शिव विहार ही पाच मेट्रो स्टेशन बंद ठेवली आहेत. ही मेट्रो स्थानकं पिंक लाईनचे आहेत. डीएमआरसीच्या माहितीनुसार, पिंक लाईनचे सर्व मेट्रो ट्रेन केवळ वेलकम मेट्रो स्टेशनपर्यंतच धावतील. बंद ठेवलेली मेट्रो स्थानकं ही वेलकम मेट्रो स्टेशनच्या पुढे आहेत.
जाफराबादमध्ये आंदोलन अजूनही सुरु
दरम्यान, काही महिला अजूनही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्याविरोधात जाफराबाद मेट्रो स्टेशनबाहेर आंदोलन करत आहेत. इथे मोठ्या प्रमाणात निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेतय सोबतच पोलिसही मोठ्या संख्येने इथे आहेत. काल दुपारी झालेल्या जाळपोळीच्या घटना पाहता अग्निशमन दलाच्या गाड्याही इथे आहेत.
ईशान्य दिल्लीतील शाळा बंद, सीबीएसई परीक्षेत बदल नाही
दिल्लीतील हिंसाचारामुळे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी परिसरातील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचं जाहीर केलं. त्यांनी ट्वीट करुन याची माहिती दिली. ते म्हणाले की, 25 फेब्रुवारी, 2020 रोजी ईशान्य दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहतील. तसंच ज्या शाळांमध्ये परीक्षा आयोजित केल्या जाणार होत्या, त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
परंतु सीबीएसईच्या परीक्षेत कोणताही बदल केलेला नाही, असं बोर्डाने पत्रकाद्वारे स्पष्ट केलं. पश्चिम दिल्लीमधील 18 केंद्रांवर वेळापत्रकानुसारच बारावीची परीक्षा होईल. दिल्लीमध्ये कोणतंही केंद्र व्होकेशनल विषयांसाठी नसल्याने बदल केलेला नाही, असं पत्रकात म्हटलं आहे.
गोळीबार करणारा तरुण ताब्यात
दिल्लीच्या मौजपूरमध्ये सोमवारी आठ राऊंड फायरिंग करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शाहरुख असं आरोपीचं नाव आहे. तो स्थानिक रहिवासी आहे. मौजपूरमध्ये सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये हिंसाचार उफळला. यादरम्यान एका तरुणाने हातात बंदूक घेऊन मौजपूर ते जाफराबादच्या रस्त्यावर गोळीबार केला. हा तरुण पोलिसांसमोर गोळीबार करत राहिला. त्याने जवळपास आठ राऊंड फायर केल्या. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबला नाही आणि गोळीबार सुरुच ठेवला.
दिल्लीतील पडसाद मुंबईतही, परंतु पोलिसांनी आंदोलकांना पांगवलं
दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबईतही पाहायला मिळाले. संध्याकाळच्या सुमारास सीएएविरोधात आंदोलक 'गेट वे ऑफ इंडिया' परिसरात जमायला सुरुवात होताच पोलिसांनी तिथून त्याना हाकलून लावलं. त्यानंतर या आंदोलकांनी आपला मोर्चा मरिन ड्राईव्हकडे वळवला. तर तिथेही मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता आणि आंदोलकांना इथूनही पिटाळून लावलं. जवळपास 100 ते 150 च्या संख्येने आंदोलक मुंबईत आंदोलनाच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी हातात मेणबत्त्याही धरल्या होत्या. मात्र, दिल्लीतील आंदोलनाची खबरदारी घेत मुंबई पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
काल दिवसभरात काय?
ईशान्य दिल्लीत काल सकाळी सात वाजता मौजपूर चौकात लोक सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ बसले होते. तर, सकाळी दहाच्या सुमारास मौजपूर चौकाच्या 200 मीटर पुढे, कबीरनगर परिसरात लोक या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले. सुमारे अर्ध्या तासानंतर कबीरनगरमधील विरोधक आणि मौजपूर चौकातील समर्थक यांच्यात दगडफेक सुरु झाली.
ही दगडफेक दुपारी एक वाजेपर्यंत सुरु होती. दरम्यान, पूर्वोत्तर भागात वेगवेगळ्या ठिकाणाहून दगडफेक आणि जाळपोळीच्या बातम्या येऊ लागल्या. जाफराबाद परिसरात दुपारी दोनच्या सुमारास घराला आग लावण्यात आली. तर, दुपारी अडीचच्या सुमारास भजनपुरा भागात हिंसाचाराची बातमी मिळाली. तिथे एका पेट्रोल पंपाला आग लावण्यात आली. गोकलपुरीचे हेड कॉन्स्टेबल दगडफेकीत गंभीर जखमी झाले. रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डीसीपी शाहदारा अमित शर्मा जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जाफराबाद परिसरात तीनच्या सुमारास एका व्यक्तीने गोळीबार केला, त्यात एक मुलगा जखमी झाला. चार वाजता कर्डमपुरी भागात पुन्हा दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी अश्रूंधुराचा मारा करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. सुमारे सहा वाजेपर्यंत हा हिंसाचार सुरु होता. सध्या शहरात तणावपूर्ण शातंता आहे.