Delhi Corona Case : राजधानी दिल्लीमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीमध्ये दोन हजार 31 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 9 जणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारच्या तुलनेत दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याचं पाहायला मिळतेय. कारण शुक्रवारी दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर 15 टक्केंपेक्षा जास्त झाला होता. शनिवारी दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर 12.34 टक्के इतका आहे. दिल्लीमधील सक्रीय रुग्णांची संख्या आठ हजार 105 इतकी झाली आहे. 


दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 16 हजार 459 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या, यापैकी दोन हजार 31 पॉझिटिव्ह आढळले आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 12.34 इतका नोंदवण्यात आला. मागील 24 तासांत दिल्लीमध्ये 2260 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या दिल्लीमध्ये पाच हजार 563 रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. तर 511 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिल्लीच्या रुग्णालयात असलेल्या रुग्णांमध्ये 186 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. तर 158 रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर आहेत. त्याशिवाय 22 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.  


मागील 24 तासांत दिल्लीमध्ये 13 हजार 770 जणांनी कोरोना लस घेतली आहे. यामध्ये 678 जणांनी पहिला डोस घेतला तर 1696 जणांनी दुसरा डोस घेतला. 11 हजार 396 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. दरम्यान, दैनंदिन रुग्णसंख्या वाढल्यामुळे दिल्लीमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मास्क न परिधान करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. 


देशातील स्थिती काय?
 देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात 15 हजार 815 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आदल्या दिवसाच्या तुलनेत गेल्या 24 तासांत नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी 746 रुग्णांची घट झाली आहे. तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 20 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात 1 लाख 19 हजार 264 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 20 हजार 18 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 35 लाख 93 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.27 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 20,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 4.36 टक्के आहे.