Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंवर (Wrestlers) झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात शनिवारी दिल्ली (Delhi) पोलिसांनी सात तक्रारदार कुस्तीपटूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कुस्तीपटूंच्या वकिलांच्या उपस्थितीत त्याचं जबाब नोंदवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जबाब नोंदवण्यात येत होते तेव्हा तक्रारदारांनी वेगवेगळ्या घटना सांगितल्या, परंतु ज्या दिवशी शोषण झाले ती तारीख कोणाच्याही लक्षात नाही. तसेच पोलिसांनी सांगितले आहे की, लवकरच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचा देखील जबाब नोंदवून घेण्यात येईल.
गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी जंतर-मंतर येथे आंदोलन करत असणाऱ्या कुस्तीपटूंशी संवाद साधला होता. त्यांनी कोणताही पक्षपातीपणा न करता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं. तसेच दिल्लीत जे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या आहेत. दिल्ली पोलिस कोणताही पक्षपातीपणा न करता चौकशी करत असल्याचं अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. तसेच, 'दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, त्यामुळे आता हे आंदोलन थांबवले पाहिजे' असं देखील केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले.
'समिती गठीत करण्यात आली आहे'
अनुराग ठाकुर यांनी कुस्तीपटुंच्या मागण्यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना म्हटले की, 'त्यांनी निष्पक्ष निवडणुकांची मागणी केली होती, ज्याची तयारी सुरु आहे. त्यांनी समिती गठित करण्याची मागणी केली होती, समिती गठित करण्यात आली आहे. त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती, ती चौकशी सध्या दिल्ली पोलीस करत आहेत. त्यामुळे मला असं वाटत आहे की, जे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत, त्यांनी ते आता थांबवावं आणि चौकशी होऊ द्यावी. तसेच चौकशी नंतर जे कोणी दोषी ठरतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल'.
23 एप्रिलपासून कुस्तीपटूंचे आंदोलन
बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशातील महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह 30 कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले होते. आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे.