National Herald Case :  काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार आहेत. आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ईडीसमोर हजर होणार आहेत. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे आंदोलन, पोलिसांनी ताब्यात घेतले
नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींना आज 10.30 वाजता ईडीसमोर हजर राहणार आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने केली असता पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांनाही ईडीनं समन्स बजावलं आहे. पण, कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या ईडीसमोर हजर राहू शकल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ वाढवून मागितला आहे. 


 






काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना परवानगी नाकारली


राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. परंतु, दिल्ली पोलिसांनी मार्चाला परवानगी नाकारली आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यास परवानगी दिली नाही. केंद्र सरकार तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं 13 जून रोजी राहुल गांधी ज्यावेळी ईडी आणि दिल्लीतील तपास यंत्रणांसमोर हजर होतील, त्यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि इतर कार्यकर्त्यांसह ईडी कार्यालयाबाहेर 'सत्याग्रह' करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावल्या प्रकरणी काँग्रेसनं देशव्यापी सत्याग्रहाची घोषणा केली होती.


नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? 


नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या 'यंग इंडिया' या कंपनीनं या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं. मात्र, हे सुरू करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयानं राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता.