जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलीस दल)जवानांच्या बसवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. मुदस्सिर अहमद खान हा त्या हल्ल्यामागचा मास्टर माईंड होता. भारतीय जवानांनी त्याला एका चकमकीत ठार केले आहे. आता त्याच्या सहकाऱ्याला पकडल्याने हे सुरक्षा दलासाठी मोठे यश असल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली पोलिसांनी सज्जादला अटक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी आता सज्जादची चौकशी करत आहेत. दरम्यान भारतीय सेनेने सांगितले की, जैशचा दहशतवादी मुद्दसिर पुलवामा हल्ल्यामागचा मास्टरमाईंड होता. सज्जाद हा त्याचा जवळचा सहकारी होता.
भारतीय सेनेने सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये कारवाई सुरु केली आहे. या कारवाईदरम्यान जम्मू काश्मीरच्या शोपियान, बारामुल्ला, बंदीपोरा, राजौरी, काश्मीर भागात अनेक चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमध्ये आतापर्यंत 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.