एअर स्ट्राईक चुकीचा, पुलवामासारखे हल्ले होतातच, काँग्रेस नेते सॅम पित्रोदांचं वादग्रस्त विधान
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2019 12:12 PM (IST)
भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेसचे ओव्हरसीज अध्यक्ष आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. काही जण भारतात येऊन हल्ले करतात, त्यासाठी तुम्ही संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणार का? असा सवाल विचारत पित्रोदांनी पाकिस्तानची बाजू मांडली आहे. पित्रोदांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होणार, असे दिसत आहे. पित्रोदा म्हणाले की मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील (काँग्रेस) विमानं पाठवू शकत होतो. परंतु हे चुकीचे आहे. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, असे म्हणत पित्रोदांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राईकवर टीका केली आहे. एअर स्ट्राईक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पित्रोदा म्हणाले की, 'मला हल्ल्याविषयी फार माहीती नाही. परंतु असे हल्ले होतच असतात. मुंबईवरदेखील हल्ला झाला होता. त्यावेळी आम्हीदेखील (तत्कालीन काँग्रेस सरकार)विमानं पाठवू शकलो असतो. परंतु ते योग्य नाही. तुम्ही (सरकार) असं वागू शकत नाही,' अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी पुलवामा हल्ला आणि भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकबाबत मत व्यक्त केले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पित्रोदांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केले आहे. मोदींनी म्हटले आहे की, विरोधकांनी पुन्हा एकदा भारतीय जवानांचा अपमान केला आहे. सर्व भारतीयांनी या लोकांना प्रश्न विचारायला हवेत.