जम्मू-काश्मीर : काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शोपियान भागात अद्याप दोन- तीन दहशतवादी लपले असल्यामुळे चकमक सुरुच आहे.

बांदीपोरा भागात झालेल्या चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा'चे दोन दहशतवादी मारले गेले असून यात 'लष्कर...'चा टॉप कमांडर अली भाई याचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. त्याचबरोबर बारामुल्लाच्या कलंतरा परिसरात भारतीय लष्कराने राबवलेल्या नमबलनार या अभियानात दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती श्रीनगर येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल कालिया यांनी दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण चार दहशतवादी ठार झाले आहेत.

कर्नल कालिया यांनी सांगितले की, अभियानादरम्यान एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर 92 बेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बारामुल्ला परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले, जवानांनी परिसराची घेराबंदीदेखील केली होती. परंतु याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीदेखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.