Delhi Weather Update : देशाच्या विविध भागात वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) तर  कुठे ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे. देशाची राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका (Delhi Cold Weather) वाढला आहे. दिल्लीत तापमानाचा पारा 3 अंशावर गेला आहे. एकीकडं थंडी तर दुसरीकडं धुक्याची चादर पसरली आहे. दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाही करण्यात आला आहे. थंडीमुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.  पालम आणि सफदरजंग भागात दाट धुक्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.


देशाची राजधानी दिल्ली आज चांगलीच गारठली आहे. आज (8 जानेवारी) दिल्लीत थंडीची लाट आणि धुक्याची चादर पसरली आहे. हवामान विभागानं आज दिल्लीत थंडीच्या लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' आणि धुक्याचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. किमान तापमान 3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. धुक्यामुळे पालम आणि सफदरजंगसह अनेक भागात दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी राहिली आहे. सध्या देशातील अनेक भागात डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. अनेक भागात दाट धुके पडले आहे. मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे.


थंडीमुळं दिल्लीतील जनजीवन विस्कळीत, धुक्यामुळं विमानसेवेवर परिणाम


वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत असल्याचं दिसत आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळं रस्त्यावरील गर्दीही कमी दिसत आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दिल्ली एनसीआरमधील लोक थंडीपासून वाचण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत. दाट धुक्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही विमानांच्या वेळांवरही परिणाम झाला आहे.


पुढच्या चार दिवसात किमान तापमानात वाढ होणार


दिवसेंदिवस देशात थंडीचा जोर वाढत आहे. विशेषत: उत्तर भारतात गारठा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढत आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवसात किमान तापमानात 4 अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. त्यामुळं नागरिकांना थंडीची लाटेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Weather Update : विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पारा घसरला, तर दिल्लीत 1.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद