Delhi Murder : दिल्ली पोलीस एका अत्यंत धक्कादायक खून प्रकरणाचे गूढ उकलण्याचा (Delhi Murder) प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा नौदलाचा माजी कर्मचारी असून त्याला 20 वर्षांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते. आरोपी अनेक वर्षांपासून आपली ओळख बदलून दिल्लीत राहत होता. त्याच्यावर खुनासोबतच चोरीचाही आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेश कुमार असे अटक आरोपीचे नाव असून तो हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी आहे. 2004 मध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.


दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला तब्बल 20 वर्षांनंतर मृत घोषित करण्यात आलेल्या फरार आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. आरोपीचे नाव 2004 च्या एका खुनाच्या गुन्ह्यात असून त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे.


आरोपी सापडला कसा? 


बवाना येथील हत्या आणि एका प्रकरणात चोरीचा आरोप असलेला बालेश कुमार हा दिल्लीतील नजफगढ भागात अमन सिंग नावाने राहत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बालेश कुमारला नजफगड येथून अटक केली.


पोलिस चौकशीत आरोपीने काय सांगितले?


पोलिस चौकशीत आरोपी बालेश कुमारने सांगितले की, 2004 मध्ये दारूच्या नशेत त्याने आणि त्याचा भाऊ सुंदर लालने राजेश नावाच्या व्यक्तीची हत्या करून मृतदेह बवाना परिसरात फेकून दिला होता. या हत्येप्रकरणी बालेशच्या भावाला अटक झाली होती आणि बालेश फरार झाला होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपी बालेश कुमार हा त्याचा भाऊ सुंदर लाल आणि राजेशसोबत दारू पीत होता. त्याचवेळी बालेश कुमारचे राजेश कुमारच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध आणि पैशाच्या व्यवहारावरून भांडण झाले. त्यावेळी आरोपी बालेश कुमार आणि सुंदर लाल यांनी राजेशची गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह दिल्लीतील बवाना पोलीस स्टेशन परिसरात फेकून दिला.


आरोपीला मृत कसे घोषित केले?


क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान जोधपूरमध्ये एका ट्रकला आग लागून त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक बालेश कुमार असल्याचे घोषित केले होते. एवढेच नाही तर बालेश कुमारच्या पत्नीला विम्याची रक्कमही मिळाली असल्याचं समोर आलं आहे. 


बनावट कागदपत्रे बनवून ओळख बदलली


बालेश कुमारने रोशन गार्डन, नजफगढ येथील रहिवासी अमन सिंग अशी आपली नवीन ओळख निर्माण केली आणि बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तयार करून बँक ऑफ इंडियामध्ये बँक खाते उघडले असेही तपासात उघड झाले आहे. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.


ही बातमी वाचा :