मुंबई: गोवंडी पोलिसांना दुहेरी हत्येची उकल (Govandi Murder Case) करण्यास यश मिळालं आहे. आंतरधर्मीय लग्न केल्यामुळे नाराज झालेल्या वडिलांनीच आपल्या मुलीची आणि जावयाची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणात वडील, भाऊ आणि भावाच्या मित्राला अटक करण्यात आली असून तीन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
करण चंद्र ( वय 22) आणि गुलनाज खान ( वय 20) यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाला प्रेमविवाह झाला होता. मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. आंतरधर्मीय विवाह असल्याने मुलीच्या वडिलांचा त्याला विरोध होता. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी म्हणजे गोरा खान यांनी आणि मुलीच्या भावाने त्या दोघांचीही हत्या केली होती. जावयाचा गळा चिरला होता तर मुलीचा गळा आवळून खून केला होता. नंतर मुलीचा मृतदेह हा खारघरमध्ये सापडला होता.
मुलीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हिंदू मुलाशी लग्न केले होते. याचा राग येऊन मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांची हत्या करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. पोलिसांना प्रथम मुलाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा उलगडा झाला असता आरोपींच्या चौकशीत दुसरा मृतदेहही सापडला. अशा प्रकारे पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे.
मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशन परिसरात 14 ऑक्टोबर रोजी एका तरुणाचा अनोळखी मृतदेह आढळून आला होता. मृत व्यक्तीचे वय 20 ते 22 वर्षे दरम्यान असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या झोन-6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके तयार केली होती. तपास पथकांनी मृताची ओळख 22 वर्षीय करण रमेश चंद्र अशी केली. करण हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलीस चौकशी सुरू केली असता त्या युवकाने नुकतेच प्रेमविवाह केल्याचे निष्पन्न झाले. त्याची पत्नीही बेपत्ता होती. या तपासादरम्यान पोलिसांनी मुलीचे वडील गोरा रईसुद्दीन खान (वय 50 वर्षे) याची चौकशी केली. संपूर्ण तपासात गोरा खान हा या हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे.
इच्छेविरुद्ध लग्न, त्यामुळे गुलनाजनचा खून केला
या घटनेत गोरा खानचा मुलगा सलमान गोरा खान (वय 22 वर्षे) आणि त्याचे तीन अल्पवयीन मित्र सामील असल्याचे पोलिसांना समजले. गोरा खानची मुलगी गुलनाज हिच्याबद्दल चौकशी केली असता तिची हत्या झाल्याचे उघड झाले. गुलनाजने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध करण या हिंदू धर्मातील मुलाशी लग्न केले होते. गेल्या वर्षीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. आतापर्यंत गोरा रईसुद्दीन खान, त्याचा मुलगा सलमान गोरा खान आणि त्याचा मित्र मोहम्मद कैफ नौशाद खान यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यासोबतच हत्येमध्ये सहभागी असलेल्या ३ अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: