नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाचं ह्रदय मानल्या जाणाऱ्या मुघल गार्डनची सफर आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. 9 मार्चपर्यंत सकाळी 9.30 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही मुघल गार्डनमधली रंगीबेरंगी फुलं डोळे भरुन पाहू शकाल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परवाच उद्यानोत्सवाचं उद्घाटन केलं.
पुढील जवळपास महिनाभर मुघल गार्डनची सफर पर्यटकांना करता येईल. फक्त 2 मार्च रोजी होळीनिमित्त मुघल गार्डन बंद ठेवण्यात येणार आहे. 9 मार्च रोजी शेतकरी, लष्करातील जवान, अंध-अपंगांसाठी मुघल गार्डनची सफर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, सूटकेस किंवा इतर साहित्य आत घेऊन जाण्यास मनाई आहे.
मुघल गार्डनची वैशिष्ट्यं
जम्मू काश्मीरातील मुघल गार्डनच्या धर्तीवर सर एडविन ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनात मुघल गार्डनची निर्मिती केली.
1917 साली तयार करण्यात आलेलं मुघल गार्डन तब्बल 15 एकरावर पसरलेलं आहे.
भारतीय आणि पाश्चात्य देशांमधील फुलांची विशेष लागवड करण्यात आली आहे.
159 जातीची विशेष फुलं गार्डनमध्ये फुलवण्यात आली आहेत, तसंच 50 प्रकारची इतर झाडंही लावण्यात आली आहेत.
ट्युलिप, लिली, डॅफोडिलसह इतर मोसमी फुलांचे ताटवे तुमच्या स्वागताला तयार असतात.
म्युझिकल गार्डन, आयुर्वेदिक फुलांचे ताटवे, बोन्साय ही मुघल गार्डनची खास वैशिष्ट्यं आहेत.
पाहा फोटो: मनमोहक फुलांचे ताटवे, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन