नवी दिल्ली : आम्ही केंद्रात सत्तेवर आलो, तेव्हा आम्हाला वारसा म्हणून खड्डेच खड्डे मिळाले. त्यामुळे आमचा बराचसा वेळ हे खड्डे बुजवण्यात गेला, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार अमित शाह यांनी केली. राज्यसभेत अमित शाहांनी केलेलं पहिलंवहिलं भाषण तब्बल 70 मिनिटं चाललं.

देशातील तरुण पकोडे किंवा भजी विकून कुटुंब चालवत असेल, तर त्यात गैर काय? त्यांची भिकाऱ्यांशी तुलना करुन थट्टा करणं कितपत योग्य आहे? असा सवाल करत अमित शाह यांनी चिदंबरम यांच्यावर तोफ डागली.

'देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे मान्यच. पण जर तुम्ही (काँग्रेस) 55 वर्ष देशावर सत्ता गाजवूनही हा प्रश्न कायम राहिला असेल, तर त्यासाठी नेमकं जबाबदार कोण म्हणायला हवं?' असा प्रश्न शाहांनी उपस्थित केला.

राज्यसभेवर निवडून गेल्यावर अमित शाहांचं आज पहिलंच भाषण होतं. 'तुम्हाला पुढची सहा वर्ष मला ऐकावंच लागेल' असं म्हणत भाषणात व्यत्यय आणणाऱ्या विरोधकांना शाहांनी गप्प केलं.

चार वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने केलेल्या 'ऐतिहासिक कामगिरीचा' जयघोष यावेळी अमित शाह यांनी केला. शाहांच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारच्याच बाकड्यावर बसले होते. जीएसटीला 'गब्बर सिंग टॅक्स' संबोधणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाही शाहांनी समाचार घेतला.