नवी दिल्ली :  कोरोनाच्या काळात जिथे सगळी यंत्रणा ठप्प झाली होती तिथे काही लोक देवदूतासारखे लोकांच्या मदतीला धावून जात होते. युथ काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास, दिल्लीत आम आदमी पक्षाचा दिलीप पांडे ही नावं या मदतकार्यामुळे चर्चेत आली. पण आता यांच्या मदतीबद्दल आभार मानायचे सोडून त्यांचीच चौकशी दिल्ली पोलिसांनी सुरु केली आहे.


युथ काँग्रेसचा अध्यक्ष श्रीनिवास हा कोरोनाच्या काळातल्या मदतकार्यानं चर्चेत आला होता पण कुणीतरी तक्रार केली हे मदतकार्य नेमकं होतंय कसं याची चौकशी करा आणि दिल्ली पोलीस तत्परतेनं या मोहीमेवर निघाले. दिल्लीत युथ काँग्रेसच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी चौकशी केली.


कोरोना काळातल्या मदतीमुळे युथ काँग्रेस श्रीनिवासचं नाव देशभरात चर्चेत आलं होतं.विरोधी पक्षाच्या नेत्यांपासून, दिल्लीतल्या पत्रकार, सामान्यांपर्यंत कुणीही मदतीसाठी श्रीनिवासला मदतीसाठी विनवणी करत होतं…पक्षभेद न करता त्याला मदत पोहचतही होती.ऑक्सिजन सिलेंडर असो, रेमडेसिविर असो की कुणाला बेड मिळवून देणं असो. सरकारी यंत्रणा जिथं हतबल ठरत होती तिथं युथ काँग्रेसची ही टीम सामान्यांच्या मदतीला पोहचत होती.


आता काँग्रेसची ना केंद्रात सत्ता आहे ना दिल्लीत. पण तरीही युथ काँग्रेसचा अध्यक्ष एवढी मदत आणतो कुठून असा प्रश्न एका रिकाम्या डोक्यात पडला…आणि दिल्ली पोलिसांनी त्यावर तातडीनं तत्परता दाखवत चौकशी सुरु केली.


दिल्ली पोलिसांच्या या चौकशीतही एक विशेष पॅटर्न आहे. श्रीनिवासप्रमाणेच आम आदमी पक्षाचा दिलीप पांडे हा देखील अशा मदतकार्यामुळे चर्चेत होता. कोरोना काळातल्या मदतीचा चेहरा बनला होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलीस त्याच्याही चौकशीला पोहचले होते.


श्रीनिवास हे मदतकामामुळे इतकं चर्चेत होते की अगदी दिल्लीतलं न्यूझीलंड दूतावास असो की भाजप खासदार हंसराज हंस यांनाही सिस्टीमपेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास वाटला. त्यामुळेच त्यांनी मदतीसाठी थेट त्यालाच विनवणी केली होती. श्रीनिवास यांची टीम नेमकी कसं काम करते हे एबीपी माझानंही दाखवलं होतं.


 दिल्ली पोलीस आहे केंद्र सरकारच्या ताब्यात…कोरोनाच्या काळात सरकार कुठे गायब आहे अशी टीका माध्यमांवर सुरु झालीय. तशी मुखपृष्ठं छापून येऊ लागलीयत. गृहमंत्री अमित शाह बंगालच्या निवडणुकीपासून गायब आहेत…पण त्यांचं पोलीस मात्र अशा पद्धतीनं जे मदतकाम करतायत त्यांच्या मागे लागलं आहे.आता आपल्या प्रशासनानं या सूडबुद्धीत जी तत्परता दाखवली तीच कोरोनाशी लढण्यात दाखवली असती, तिथं उर्जा खर्च केली असती तर कदाचित आज देशात इतकं वाईट चित्र दिसलं नसतं.