नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेच्या 270 जागांसाठी मतदान पार पडलं असून 'एबीपी न्यूज' आणि 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणानुसार पालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे. तिन्ही कॉर्पोरेशनमध्ये भाजप 3-0 ने विजय प्राप्त करण्याची चिन्हं असून काँग्रेस-आपसाठी अस्तित्वाची लढाई ठरु शकते.
निवडणुकांचे निकाल 26 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 54 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेत काँग्रेस-आपचा सुपडासाफ झाला होता. मात्र 2015 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने जबरदस्त कमबॅक केलं. मात्र यंदा महापालिका निवडणुकीत आपचा पराभव होण्याची शक्यता सर्वेक्षणात व्यक्त केली जात आहे.
तीन निगमांमध्ये 272 पैकी 270 जागांसाठी मतदान झालं. भाजपला 218 जागा मिळण्याची शक्यता 'एबीपी न्यूज' आणि 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे. आप आणि काँग्रेसला केवळ प्रत्येकी 25 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. बसप आणि इतरांच्या वाट्याला चारच जागा येऊ शकतात.
धक्कादायक म्हणजे तिन्ही कॉर्पोरेशनपैकी एकाही ठिकाणी काँग्रेस किंवा आपला दुहेरी आकडा गाठता येण्याची शक्यता कमी आहे, असं सर्वेक्षणात म्हटलं आहे.
2012 मधील निवडणुकांचे आकडे
गेल्या दहा वर्षांपासून दिल्ली नगर निगमवर भाजपची सत्ता आहे. गेल्या निवडणुकांत भाजपला 138, काँग्रेसला 77 तर बसपला 57 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी आम आदमी पक्षाचं अस्तित्वच नव्हतं.
एमसीडी म्हणजे काय?
एमसीडीची 1958 साली स्थापना झाली. दिल्लीचा 96 टक्के भाग हा एमसीडी अंतर्गत येतो. या सर्व भागाचं 2011 मध्ये तीन भागात विभाजन करण्यात आलं. सध्या उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीसाठी स्वतंत्र महापालिका आहेत.