नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने मनमोहन सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 8.45 वाजता मनमोहन सिंह यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.


मनमोहन सिंह यांना कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. मात्र चिंता करण्याचं कारण नसल्याचा त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे. डॉ. मनमोहन सिंह यांची याआधी एम्स रुग्णालयात हार्ट सर्जरी झाली आहे.





मनमोहन सिंह रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच सर्वांनीच त्यांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना सुरु केली. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. देशातील बड्या राजकीय नेत्यांनीही ट्वीट करुन मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.











मनमोहन सिंह देशाचे 13 वे पंतप्रधान

डॉ. मनमोहन सिंह हे भारताचे 13 वे पंतप्रधान आहेत. त्यांनी सलग दहा वर्ष 2004 ते 2014 देशाची सेवा केली आहे. डॉ. मनमोहन सिंह हे अर्थतज्ज्ञही आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 15 वे गवर्नर म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे. जून 1991 पासून 1996 पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कामकाज पाहिलं आहे.