चालत्या कारमध्ये चाकू भोसकून पत्नीचा खून, 60 वर्षीय पतीला अटक
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2016 06:09 PM (IST)
नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये आज दिवसाढवळ्या एका पतीनं आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली. दिल्लीतील आनंद निकेतन या उच्चभ्रू परिसरातील 60 वर्षीय मुकेश मोगा यांनी आपली पत्नी मंजू मोगावर चालत्या कारमध्ये चाकूनं वार करुन हत्या केल्याचं समोर आलं. नेहमीप्रमाणे मुकेश आपल्या पत्नीला सकाळच्या वेळेस म्युझिक इन्स्टिट्यूटमध्ये सोडण्यास जात होते. त्याचवेळेस त्यांचं कारमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. हा वाद एवढा विकोपाला गेला की, मुकेशनं आपल्या पत्नीवर थेट चाकूनच हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार त्या इन्स्टिट्यूटच्या बाहेरच झाला जिथे मंजू संगीत शिकविण्यासाठी जात होत्या. यावेळी येथील एका कर्मचाऱ्यांनी मंजूला वाचवण्याचा प्रयत्नही केला पण मुकेशनं त्यालाही धमकावलं. या घटनेनंतर पोलिसांनी साठ वर्षीय आरोपी मुकेशला तात्काळ अटक केली. पण पती-पत्नीमध्ये नेमका कशावरुन वाद झाला याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.