Delhi Lockdown Extended: देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता या भागात प्रशासनानं लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. ज्यामुळं आता दिल्लीत 3 मे, सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचं नागरिकांना पालन करावं लागणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी त्यांनी दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्याचाही मुद्दा अधोरेखित केला. 


'दिल्लीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. ज्यामुळं लॉकडाऊनचा कालावधी पुढील सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे. लॉकडाऊनदरम्यान आम्ही पाहिलं की, पॉझिटीव्हिटी रेट जवळपास 36-37 टक्क्यांवर पोहोचला. दिल्लीत या प्रकारचा संसर्ग आम्ही आजवर पाहिला नाही. मागील एक- दोन दिवसांमध्ये संसर्गाचा वेग काहीसा कमी झाला असून, आज तो 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे', असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. 


Corona Second Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्टीत मात्र याउलट चित्र 


दिल्लीला जवळपास 700 टन ऑक्सिजनची आवश्यकता असून सध्याच्या घडीला 330 ते 335 टन ऑक्सिजन दिल्लीपर्यंत आला असल्याची माहिती देत, केंद्राकडूनही ऑक्सिजन तरतुद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्याच्या घडीला केंद्राकडून सहकार्य मिळत असल्याचं म्हणत या प्रसंगी केंद्र आणि दिल्लीतील सत्ताधारी एकजुटीनं काम करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 




दिल्लीत कोरोनामुळं एका दिवसात 357 मृत्यू 


दिल्लीत कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंचा आकडा दर दिवशी वाढतच आहे. मागील 24 तासांत एकट्या दिल्लीमध्ये कोरोनामुळं 357 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंतचे हे सर्वाधिक मृत्यू ठरल्यामुळं प्रशासनाच्या अडचणीही वाढल्या. सध्याच्या घडीला दिल्लीत 93,080 इतके सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. येत्या काळात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणणं हेच येथील प्रशासकिय यंत्रणा आणि आरोग्य विभागाचं लक्ष असेल.