Delhi Girl Dragged Case: एकीकडे संपूर्ण जग न्यू ईअर सेलिब्रेट करत होतं आणि दुसरीकडे दिल्लीत मात्र एक धक्कादायक घटना घडत होती. न्यू ईअर पार्टी करुन कुतुबगढच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चारचाकीने स्कूटीवरुन जाणाऱ्या एका तरुणीला धडक दिली. तसेच, नशेत असलेल्या या तरुणांनी तिला अक्षरश: सहा ते सात किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. यात तरुणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. यानंतर याप्रकरणी अनेक गोष्टी समोर आल्या. तसेच, अनेक आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले. तरुणीच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून तरुणीवर अत्याचार करुन हत्या केल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीतील कांजवाला घटनेत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णन (27) , मिथुन (26) आणि मनोज मित्तल (27) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आता याप्रकरणी नवे खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी अनेक गुपितं उघड केली आहेत.
Delhi Girl Dragged Case: नेमकं काय घडलं होतं 'त्या' रात्री?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितनं त्याच्या मित्राची गाडी आणली आणि दोघांनी मिळून नव्या वर्षाची पार्टी करण्याचा प्लॅन केला होता. पार्टीसाठी मुरथलला जाण्याचा बेत आखला गेला. मुरथल येथे प्रचंड गर्दी असल्यानं जेवण मिळत नव्हतं. यानंतर पाचही जण परत आले. मुरथलला जाताना आणि येताना गाडीत पाचही जणांची दारू पार्टी सुरूच होती.
Delhi Girl Dragged Case: स्कूटी समोरून येऊन आदळली
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे अडीच ते तीन बाटल्या दारूचं सेवन पाच जणांनी केलं होतं. मुरथलवरुन परतताना पीरागढीजवळ पाचही जणांनी जेवण केलं. त्यानंतर मनोज मित्तलला घरी सोडण्यासाठी पाचही जणांनी गाडी त्याच्या घराच्या दिशेला वळवली. तेवढ्यात समोरून एक स्कूटी गाडीवर येऊन धडकली. रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान हा अपघात झाला. धडकल्यानंतर स्कूटी कारच्या समोर होती. त्यानंतर पाचही जणांनी गाडी मागे घेतली आणि तिथून पळ काढला. पण त्याचवेळी मुलगी गाडीत अडकली होती. यादरम्यान जो गाडी चालवत होता, त्यालाही काहीतरी अडकल्याचं जाणवलं, मात्र बाकीच्यांनी काहीही नसल्याचं सांगितलं आणि गाडी पळवत राहा, असा आरडाओरडा केला.
Delhi Girl Dragged Case: आरोपींच्या जबाबाची चौकशी होणार
गाडीनं यूटर्न घेतला तेव्हा मिथुन डाव्या बाजूला बसला होता. त्याला मुलीचा हात दिसला. त्यांनी गाडी थांबवली, तर मुलगी खाली पडली. सर्वांनी खाली उतरून बघितलं आणि घाबरुन तिथून पळ काढला. त्यांनी ज्या व्यक्तीकडून गाडी घेतली होती, त्याला गाडी परत केली आणि अपघात झाल्याचंही सांगितलं. पण अपघात किती मोठा होता, हे सांगितलं नाही. या सर्वबाबी आरोपींनी आपल्या जबाबात सांगितल्या आहेत. पोलीस या सर्वांच्या जबाबाची पडताळणी करत आहेत.
Amit Shah on Delhi Girl Dragged Case: दिल्लीजवळील घटनेच्या चौकशीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश
दिल्लीतील कंझावाला अपघात आणि मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतलीय. तातडीने अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. मध्यरात्री स्कूटीवरून घरी चाललेल्या तरूणीला धडक देऊन नंतर तिला सहा ते सात किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या तरुणीचा विवस्त्र मृतदेह पोलिसांना सापडला होता. दरम्यान, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Delhi Girl Dragged Case: 'त्या' रात्री दिल्लीत नेमकं काय घडलं?
दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू ईअर पार्टी करुन कुतुबगढच्या दिशेनं वेगानं जाणाऱ्या चारचाकीनं स्कूटीवरुन जाणाऱ्या एका तरुणीला धडक दिली. नशेत असलेल्या या तरुणांनी तिला अक्षरश: सहा ते सात किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. यात या तरुणीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आधी तरुणीला फरफटत आणलं. त्यानंतर पुन्हा तिला गाडीत टाकून नेलं. आणि दहा ते पंधरा मिनिटांनी त्याचठिकाणी येऊन मृतदेह गाडीतून फेकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान, या घटनेचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून, कार यू-टर्न केल्याचं आणि कारखाली काहीतरी अडकल्याचं दिसून येतं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Delhi Girl Drag Case : "हा अपघात नाही, आधी अत्याचार मग हत्या"; पीडितेच्या आईचा आरोप