नवी दिल्ली : डॉक्टरांचा निष्काळजीपणा काहीवेळा रुग्णाच्या जीवाशी खेळ करु शकतो, याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. दिल्लीच्या एका खाजगी रुग्णालयात 24 वर्षीय तरुणाच्या चुकीच्या पायावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे.

 
दिल्लीच्या अशोक विहार परिसरात राहणाऱ्या रवी राय या तरुणाच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. मात्र रुग्णालयाने चक्क त्याच्या डाव्या पायाची शस्त्रक्रिया केली. रविवारी पायऱ्यांवरुन घसरल्याने त्याचा उजवा पाय प्रचंड दुखत होता. त्याला तात्काळ शालिमार बागेतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा सीटी स्कॅन आणि एक्स रे काढल्यानंतर रवीला फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

 
रवीच्या उजव्या पायाच्या घोट्यात फ्रॅक्चर असून घोट्याला आधार देण्यासाठी पिन टाकाव्या लागतील. म्हणून रवीची तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं रवीचे पिता रामकरण राय यांनी म्हटलं आहे.

 
'डॉक्टरांवर विश्वास ठेवत आम्ही तात्काळ सर्जरीसाठी तयार झालो. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा रवीला शुद्ध आली, तेव्हा त्याच्या उजव्या नव्हे डाव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं आम्हाला समजलं. दुखापतग्रस्त उजव्या पायाऐवजी सुस्थितीतील डाव्या पायावर सर्जरी केल्याचं समजताच आम्हाला धक्का बसला' अशी प्रतिक्रिया रवीच्या वडिलांनी दिली आहे. रवीला आता दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

 
राय यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. न्याय मिळवण्यासाठी त्यांनी मेडिकल काऊन्सिल आणि डीएमएकडेही धाव घेतली आहे. चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया करणं ही वैद्यकीय निष्काळजीपणाची परिसीमा आहे, असं रवीचे पालक म्हणतात.

 
दरम्यान, रुग्णाची सुरक्षा आमच्यासाठी प्राधान्यक्रमावर असून या प्रकरणी आम्ही तातडीने लक्ष घालू. गरज वाटल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही रुग्णालय प्रशासनाने दिलं आहे.