नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमची निकटवर्तीय हनीप्रीतला दिल्ली हायकोर्टाने दणका दिला आहे. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर फरार झालेल्या हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.


जीवाला धोका असल्यामुळे हनीप्रीत समोर येत नसल्याचं तिच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर कोर्टाने हनीप्रीतला सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन देण्याच्या अटीवर समोर येण्याचे आदेश दिले. हनीप्रीत येत्या दोन दिवसात समोर येण्याची शक्यता आहे.

हनीप्रीतच्या जामिन अर्जात काय?

‘माझ्या जीवाला धोका आहे. मी बालपणापासूनच डेऱ्याशी जोडली गेले आहे. राम रहीमची मुलगी असणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हरियाणा पोलिसांनी माझं नाव वॉण्टेड लिस्टमध्ये टाकलं आहे.’ असं हनीप्रीतने तिच्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटलं आहे.

मीडियामध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यावाचून माझ्याजवळ कोणताही पर्याय नाही. माझ्याविरोधात कोणतीही केस नाही. जबरदस्ती मला गुन्ह्यात गोवलं जात आहे, असा दावाही तिने केला.

‘मी एकटी आहे आणि मला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मला तपासात सहभागी व्हायचं आहे. मी कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाणार नाही. मला तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी कोर्टाकडे विनंती करते.’ असं हनीप्रीतने अर्जात म्हटलं आहे.

हनीप्रीत ही बेपत्ता झालीच नव्हती, सोमवारी ती स्वतः आपल्याला ऑफिसमध्ये भेटायला आल्याचा दावा हनीप्रीतच्या वकिलांनी केला. पोलिसांनी मात्र हनीप्रीत दिल्लीत असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

हनीप्रीत ही आपली मानलेली मुलगी असल्याचं बाबा राम रहीम सर्वांना सांगायचा. मात्र हनीप्रीतचे बाबा राम रहीमशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिच्या घटस्फोटित नवऱ्याने केला होता.

वकिलांच्या मार्फत हनीप्रीतने अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळून लावले. ‘माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. बापलेकीच्या नात्याला चुकीच्या पद्धतीने जगासमोर आणण्यात आलं आहे’ असा दावा तिने केला.

बाबा राम रहीमला शिक्षा झाल्यापासून आजपर्यंत हनीप्रीत फरार आहे. तिच्या चौकशीत बाबा राम रहीमचे अनेक काळे कारनामे पुढे येतील, असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे हनीप्रीतविरोधात अटक वॉरट काढलं गेल्यानंतर तिचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या :

पोलिसांना गुंगारा देणारी हनीप्रीत नेपाळमध्ये दिसली : सूत्र


हनीप्रीतचा शोध सुरुच, बिहारमधील सात जिल्ह्यात अलर्ट जारी


हनीप्रीतच्या कुटुंबातील सदस्यही गायब


राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस


हनीप्रीत नेपाळच्या बिराटनगरमध्ये लपलेली, सुत्रांची माहिती


हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध, हनीप्रीतच्या पतीचा आरोप