नवी दिल्ली : दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मद्यशौकिनांना जोरदार झटका दिला आहे. दिल्लीमध्ये दारु विक्रीवर 'विशेष कोरोना शुल्क' लावला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता दारु एमआरपीपेक्षा 70 टक्के जास्त महाग मिळणार आहे. आज (5 मे) सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत.

याचा अर्थ असा की, दारुच्या एमआरपीवर 70 टक्के कर अधिक वसूल केला जाणार आहे. समजा दिल्लीमध्ये दारुची एक बॉटल 1000 रुपयांना मिळत असेल तर आता ग्राहकांना त्यासाठी 1700 रुपये मोजावे लागतील. दारुच्या दुकानांबाहेर गर्दी हटवण्याचा उपाय म्हणून दिल्ली सरकारच्या या निर्णयाकडे पाहिलं जात आहे.


गृहमंत्रालयाने 4 मे पासून लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी आणखी वाढवला. ग्रीन आणि झोनमध्ये मद्य आणि तंबाखूची दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली. तसंच रेड झोनमध्येही कन्टेंटन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली. यानंतर देशभरात जवळपास 40 दिवसांनी दारुची दुकानं पुन्हा सुरु झाली आणि मद्यप्रेमींची, तळीरामांची दारु खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले.

पोलिसांकडून सौम्य लाठीमार
दारुच्या बऱ्याच दुकानांबाहेरील गर्दी अनियंत्रित झाल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्याने दुकानं बंद करावी लागली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नाराजी
दुकानांबाहेरील गर्दीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "दिल्लीतील काही दुकानांबाहेर गोंधळ पाहायला मिळाला ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही आणि इतर नियमांचं उल्लंघन केल्याचं समजलं तर आम्हाला तो परिसर सील करावा लागेल. तसंच तिथे दिलेली शिथिलताही मागे घ्यावी लागेल. दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील."

Nashik Liquor Shop | दारू विकत घेण्यासाठी नाशिकच्या तळीरामांची धडपड, तासनतास रांगा लावत दारुसाठी प्रतिक्षा