नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआयने (CBI) अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) सहायक संचालक पवन खत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मद्यविक्रेते अमनदीप ढल यांच्याकडून पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरुन खत्री यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने खत्रीसह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली तक्रार नोंदवली होती. आता तपासानंतर खत्रीला अटक करण्यात आली आहे.


ईडीच्या विनंतीवरुन सीबीआयने दोन आरोपी अधिकारी, सहाय्यक संचालक पवन खत्री आणि अतिरिक्त विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, अटकेतील व्यावसायिक अमनदीप सिंह ढल, गुरुग्रामचे रहिवासी बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाऊंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


ईडीच्या तक्रारीनुसार, व्यावसायिक अमनदीप सिंग ढल आणि बिरेंद्र पाल सिंह यांनी उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात चालू असलेल्या तपासात मदत मिळावी यासाठी डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान प्रवीण वत्स यांना 5 कोटी रुपये दिले होते. प्रवीण वत्स यांनी ईडीला सांगितलं की, दीपक सांगवान यांनी काही पैशांच्या बदल्यात अमनदीप ढल यांना अटकेपासून वाचवण्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. सांगवानने डिसेंबर 2022 मध्ये ईडी अधिकारी पवन खत्री यांच्याशी वत्सची ओळख करुन दिली होती.


असा व्यवहार झाला


दीपक सांगवान यांनी आश्वासन दिल्यानंतर प्रवीण वत्स यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या सहा हप्त्यांमध्ये अमनदीप ढल यांच्याकडून 3 कोटी रुपये घेतले. दीपक सांगवान यांनी नंतर वत्सला सांगितलं की, अमनदीप सिंग ढल यांना आणखी दोन कोटी रुपये दिल्यास त्यांना आरोपींच्या यादीतून वगळले जाऊ शकते. प्रवीण वत्स यांनी ही बाब अमनदीप ढाल यांना सांगितली आणि त्याच्या प्रस्तावाला सहमती दिल्यानंतर त्यांनी ढल यांच्याकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या चार हप्त्यांमध्ये आणखी दोन कोटी रुपये घेतले.


प्रवीण वत्स यांनी ईडीला असंही सांगितलं की अमनदीप सिंह ढल यांच्या वडील बिरेंद्र पाल सिंह यांच्याकडून मिळालेल्या पैशांपैकी त्यांनी दीपक सांगवान आणि पवन खत्री यांना 50 लाख रुपये दिले होते. पेमेंट रोख स्वरुपात करण्यात आले आणि डिसेंबर 2022 च्या मध्यात वसंत विहारमधील ITC हॉटेलच्या मागे पार्किंगमध्ये सांगवान आणि खत्री यांना 50 लाख रुपये देण्यात आले. मात्र, सांगवानच्या आश्वासनानंतरही अमनदीप ढल यांना ईडीने 1 मार्च 2023 रोजी अटक केली. अटकेनंतर प्रवीण वत्स यांनी दीपक सांगवान यांची भेट घेतली. त्यावेळी सांगवानने सांगितलं की, अटकेचे निर्देश उच्च अधिकार्‍यांकडून आले होते, त्यांचा त्यांच्यावर वचक नाही.


उत्पादन शुल्क धोरणाचा तपास करणाऱ्या टीमचा भाग नव्हते


सूत्रांच्या माहितीनुसार सहाय्यक संचालक पवन खत्री, अतिरिक्त विभागीय लिपिक नितेश कोहर हे दोघेही उत्पादन शुल्क धोरणाची चौकशी करणाऱ्या टीमचा भाग नव्हता. ईडीच्या तक्रारीत असं लिहिलं आहे की ईडीने सहाय्यक संचालक पवन खत्री, नितेश कोहर आणि विक्रमादित्य यांच्या घरावर छापे टाकले होते. झडतीदरम्यान सीए प्रवीण वत्सच्या घरातून 2.2 कोटी रुपये जप्त करण्यात आले. हे 2.2 कोटी 5 कोटी रुपयांच्या लाचेचाच एक भाग होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा छापा टाकण्यात आला होता.


हेही वाचा


Navi Mumbai: घरी सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन; सीबीआय चौकशीला कंटाळून कस्टमच्या अधिकाऱ्याची आत्महत्या