नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका मोराला तिरंग्यात गुंडाळून अंतिम निरोप देण्यात आला. शहीद जवान किंवा विशिष्ट पद भूषवणाऱ्यांना व्यक्तींसाठी पाळला जाणारा प्रोटोकॉल दिल्ली पोलिसांनी एका मोरासाठी वापरल्याने वाद उपस्थित झाला आहे.
मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे तिरंग्यात गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.


दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेटवर जखमी अवस्थेत आढळलेल्या मोराला पोलिसांनी चांदनी चौकातील प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. मोराचा मृतदेह जौनपूरमधील रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पोलिसांनी मोराला एका लाकडी पेटीत बंद केलं. पेटीभोवती तिरंगा गुंडाळून त्याचं दफन केलं.

मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने आपण प्रोटोकॉलचं पालनच करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मोराला सन्मानाने अंतिम निरोप देणं हा प्रोटोकॉल असून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली, तरी आपण हेच करु असंही दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

मोर हा शेड्यूल -I पक्षी असल्यामुळे पोलिसांनी वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचं वन्यजीव कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
कायद्यानुसार शेड्यूल -I वर्गातील पक्षी राज्याची संपत्ती असते. त्याचा मृतदेह आढळल्यास त्याच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्याचा हक्क फक्त राज्य वनविभागाकडे आहे.

मोराच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी झाडावरुन पडल्यामुळे मोर जखमी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.